
आमच्याबद्दल
ग्रामपंचायत येतगाव
🌾 येतगाव गावाची यशोगाथा
येतगाव ग्रामपंचायत ही महाराष्ट्र राज्यातील एक प्रगतिशील ग्रामपंचायत आहे. आम्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहोत. पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जनतेच्या सेवेच्या तत्त्वावर आमचे काम चालते.
ग्रामपंचायत स्थापना आणि स्थानिक ओळख
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या दक्षिणेकडे, येरळा नदीच्या सुपीक किनाऱ्यावर आणि सातारा–विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले सुंदर आणि समृद्ध गाव म्हणजे येतगाव. तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २५ किमी आणि औद्योगिक विटा शहरापासून १३ किमी अंतरावर वसलेले हे गाव नैसर्गिक संपन्नता, धार्मिक श्रद्धा आणि प्रगत शेतीसाठी प्रसिद्ध आहे.
ताकारी व टेंभू सिंचन योजनेच्या पाण्यामुळे या परिसरात समृद्धी फुलली आहे. गावामध्ये कणसे मळा, मोहिते मळा, सुतार मळा, येरळा काठ, हेळाचा मळा आणि सावंतपूर या वस्तींचा समावेश आहे.
धार्मिक व ऐतिहासिक वारसा
येतगाव हे धार्मिकतेने ओथंबलेले गाव आहे. गावाच्या मध्यभागी असलेले श्री धर्मराज मंदिर हे श्रद्धेचे केंद्र असून दरवर्षी "धर्मनाथ बिजोत्सव" हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
तसेच गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत — श्री कांडेश्वर मंदिर हे दगडी बांधकामातील सुबक मंदिर प्रसिद्ध आहे. याशिवाय माय्याक्का मंदिर, खंडोबा मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, म्ह्कावती मंदिर, आणि रेवणसिद्ध मंदिर ही ठिकाणे गावाच्या अध्यात्मिक वैभवाचे द्योतक आहेत.
गावाच्या उत्तरेस वसलेले सावंतपूर येथे घनदाट झाडी व जुनी वडाची झाडे गावाच्या निसर्गसंपन्नतेची साक्ष देतात.
शेती व उद्योग क्षेत्र
गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.
टेंभू योजनेच्या पाण्यामुळे गावात हिरवळ पसरली आहे. ऊस हे मुख्य पीक असून, भुईमुग, तूर, मटकी, मूग, सोयाबीन, ज्वारी आणि विविध कडधान्यांचे उत्पादनही घेतले जाते.
तसेच टोमॅटो, बीट, आले, बटाटा, भेंडी, वांगी, परसबी आणि इतर भाजीपाल्यांची लागवड गावातील प्रगतशील शेतकरी करतात.
येतगावात सिमेंट वीट कारखाने, किराणा दुकाने, हॉटेल्स, मेडिकल आणि जनरल स्टोअर्स यांसारखे व्यवसाय फुलले आहेत. काही ग्रामस्थ रोजगारानिमित्त मुंबई-पुणे येथे स्थायिक झाले आहेत.
शैक्षणिक प्रगती
येतगाव हे शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रणी गाव आहे. गावात श्री धर्मराज विद्यालय (रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज) कार्यरत असून, हे संस्थान भव्य पटांगणात वसलेले आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता भासत नाही.
तसेच गावाच्या मध्यभागी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येतगाव दिमाखात उभी आहे. ही शाळा ISO मानांकन प्राप्त असून शालेय परिसर स्वच्छ आणि आकर्षक राखण्यात आला आहे.
प्रत्येक वाडीत अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत, जिथे लहान मुलांच्या शिक्षणासह पोषणाची काळजी घेतली जाते. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी विटा किंवा कडेगाव येथे सिनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतात.
सामाजिक व सांस्कृतिक एकोपा
गावातील लोक श्रद्धाळू, परिश्रमी आणि दानशूर स्वभावाचे आहेत.
येथील समाज एकोपा आणि बंधुभावाचे उत्तम उदाहरण आहे. विविध जातीधर्माचे लोक एकत्र राहतात, उत्सव साजरे करतात आणि गावाच्या विकासात सक्रिय सहभाग घेतात.
धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात येतगाव गावाने सातत्याने प्रगती साधली आहे.
आदर्श ग्रामपंचायत
प्रगत शेती, समृद्ध शिक्षणसंस्था, धार्मिक संस्कार आणि सामाजिक एकोपा या चार आधारस्तंभांवर उभे असलेले येतगाव हे आज कडेगाव तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात "आदर्श गाव" म्हणून ओळखले जाते.
गावाच्या प्रगतीमागे ग्रामस्थांचा सहभाग, समर्पण आणि एकत्रित प्रयत्न यांचीच खरी ताकद आहे. 🌿
